नोकरीच्या शोधात 🔍
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेल्या सर्वांसमोर असणारा खूप मोठा प्रश्न…
कॉलेज तर संपलं.. आता पुढे काय??
ज्यांचं उच्च शिक्षण घ्यायचं नक्की ठरलेलं असतं त्यांना प्रश्न फारसा भेडसावत नाही पण ज्यांना जॉब करणं आवश्यक आहे त्यांचं स्ट्रगल मात्र सुरू होतं..दरवर्षी लाखो विद्यार्थी पासआऊट होतात आणि मग सुरू होतं ते मिशन नोकरी..
सर्वांना लगेच हवी तशी नोकरी मिळतेच असं नाही..कॅम्पस प्लेसमेंट मध्ये काही जण सिलेक्ट होतात पण कधी कधी त्यांचं joining letter येई पर्यंत त्या कंपनी ने त्यांच्या ज्युनीअर्सचे सुद्धा interviews घेतलेले असतात.
शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना आपण या क्षेत्रात का आलो हे त्यांनाच माहीत नसतं. पालकच ठरवतात की अमुकला स्कोप आहे, आणि मग तिकडे मुलांना पळवतात. मात्र असंही असतं की अनेक पालकांना त्या क्षेत्राची, त्यातील शिक्षणाची फारशी माहिती नसते. तशीच त्या मुलांनाही नसते. सध्या इंजिनिअरिंग करत असलेल्या आणि करू इच्छिणाऱ्या अनेक मुलांना विचारलं की, आपण इंजिनिअर व्हायचं, अमुकच शाखेतुन व्हायचं हा निर्णय कसा घेतला ?? तर अनेकांचं उत्तर ‘घरचे म्हणतात म्हणून’ हेच असतं.
मुलगा इंजिनिअर झाला म्हणजे भारी नोकरीला लागेल असं पालकांचं मत. त्यांच्या अपेक्षा, वाढतं वय आणि न दिसणारी संधी यामुळे अनेकजण शिक्षण पूर्ण करूनसुद्धा टेन्शन घेताना दिसतात आणि त्यात भरीस भर म्हणून आपले काही नातेवाईक..’झालं ना शिक्षण.. मग आता काय करणार???’ असे प्रश्न विचारून मुलांना अगदी भंडावून सोडतात. आपल्या भविष्याची चिंता आपल्यापेक्षा इतर लोकांनाच जास्ती का असते हे एक न सुटणारं कोडं आहे..
आज जवळपास ७०% विद्यार्थी अन्य क्षेत्रांमध्ये काम करताना दिसतात. शिक्षण एका क्षेत्रात करून तिथे रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध नाहीत म्हणून किंवा त्या क्षेत्रातलं आपल्याला काही येतंच नाही म्हणून दुसऱ्या क्षेत्राकडे वळतात. दुसरीकडे आयटीत ऑटोमेशन आल्यामुळे आता त्यांना जास्त मनुष्यबळाची गरज उरलेली नाही. ‘कोणी नोकरी देता का नोकरी…चार वर्षे, लाखो रुपये खर्चून, पालकांच्या आग्रहाखातर, तर कधी नातेवाईकांच्या सांगण्यावरून, मित्र घेतोय म्हणून, क्वचित प्रसंगी स्वखुशीने आणि बहुतेकदा दुसरं काहीच माहीत नसलेल्या इंजिनिअर झालेल्या तरुणाला कुणी नोकरी देता का नोकरी ? -असं आजचं चित्र आहे.
शिक्षण पूर्ण झालं म्हणजे सगळंच झालं असं नसतं ना..आयुष्य म्हटलं की त्या बरोबर स्ट्रगल हे आलंच.. पण त्यामुळे कोणतही टेन्शन न घेता आणि हार न मानता परिस्थितीशी झगडून स्वतःला सिद्ध करायला हवं..इतकं शिक्षण तुम्ही पूर्ण केलंय म्हणजे तुमच्यात ती जिद्द नक्कीच आहे..फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एका संधीची गरज आहे..आणि संधी ही सर्वांना मिळतेच.. फक्त काही जणांना ती लवकर मिळते तर काहींना त्याच्यासाठी प्रतीक्षा करावी लागते..आणि एकदा का ती संधी तुम्हाला मिळाली की तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही..त्यामुळे ज्यांना जॉब मिळाला आहे आणि तो टिकवण्यासाठी ज्यांची धडपड चालू आहे किंवा जे जॉब च्या शोधात आहेत त्यांनी अजिबात खचून न जाता संधीची वाट पाहायला किंवा संधी स्वतः निर्माण करायला शिकलं पाहिजे..लवकरात लवकर स्वतःला जाणून घ्या आणि स्वतःच करिअर घडवा..
ALL THE BEST. 😊
-प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment